काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश   

मुंबई, (प्रतिनिधी) : पुणे जिल्हयातील भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  काँग्रेसचे मंत्रीपद अनेक वर्षे भूषवलेल्या अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम हे भोर चे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि अनुभव यामुळे भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचून पुणे जिल्ह्यात भाजपाला बळ मिळेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले.
 
भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी त्यांच्या  समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी भाजपाला संग्राम थोपटेसारखा कोहीनूर हिरा लाभला आहे अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांचे पक्षात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देण्यासाठी थोपटे यांनी प्रवेश केल्याचे ते म्हणाले.
 
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारा, जमीनी स्तरावर धडाडीने काम करणारा नेता संग्राम थोपटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्ष संघनेला ताकद मिळेल असा विश्वास  रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि ज्या विश्वासाने तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
 
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यांचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या भारताची बदनामी करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात. काँग्रेसने आपले मूळ विचार सोडून दिले असून आता काँग्रेसचे राजकारण हे चापलुसीचे आहे तर भाजपाचे विकासाचे राजकारण आहे, अशा शब्दांत भाजपा  चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

Related Articles